आयुष्यभराच्या ज्ञानदानाबद्दल पूर्णपणे समाधानी व आनंदी : मुख्याध्यापक वाल्हे

जळगाव, प्रतिनिधी | शिक्षणक्षेत्रातील ३७ वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले. शिक्षकी पेशा आवडीचा असल्याने त्यात मनापासून रमलो. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर नैतिक मूल्यांची रूजवण देखील केली. त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल पूर्णपणे समाधानी व आनंदी असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक देविदास वाल्हे यांनी आपल्या सेवापूर्ती कार्यक्रमात केले.

जळगाव तालुक्यातील कंडारी  जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक देविदास वाल्हे सेवानिवृत्त झाल्याने शाळेत पाच शिक्षकांच्या उपस्थितीत सेवापूर्ती कार्यक्रम घेण्यात आला. देविदास वाल्हे यांनी सुरूवातीची तीन वर्ष शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या सेवेत प्रवेश केला. प्राथमिक शिक्षक म्हणून धारागीर ता. एरंडोल येथे एक वर्ष, कुसुंबे खुर्द ता. जळगाव येथे एक वर्ष, धानवड ता. जळगाव येथे पाच वर्ष, चिंचोली ता. जळगाव येथे अकरा वर्ष सेवा बजावली. त्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून रायपूर ता. जळगाव येथे दोन वर्ष, कंडारी ता. जळगाव येथे पाच वर्ष सेवा केली. त्यानंतर ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून त्यांनी बांभोरी ता. धरणगाव येथे आठ वर्ष आणि कंडारी ता. जळगाव येथे एक वर्ष अशी एकूण ३७ वर्ष प्रदीर्घ सेवा केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा इंगळे, संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी व डॉ. जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कारार्थी मनोगतात श्री. वाल्हे यांनी शिक्षणक्षेत्रातील सेवानिवृत्ती माझ्यासाठी क्लेशदायक असून त्याचे आनंदात परिवर्तन करण्यासाठी उर्वरित आयुष्य समाजहितासाठी समर्पण करणार असल्याचे सांगितले. शाळेतून निघतांना त्यांनी शाळेच्या पायरीला वाकून नमस्कार करीत ऋण व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. जगदीश पाटील यांनी मानले.

मुख्याध्यापकपदी संतोष वानखेडे

देविदास कोल्हे यांच्या सेवानिवृत्तीनंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक संतोष वानखेडे यांनी मुख्याध्यापकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. श्री. वाल्हे यांनी आपल्या पदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली. त्यानंतर श्री. वानखेडे यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा इंगळे व देविदास वाल्हे यांनी करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने झटत राहणार असल्याचे नवनियुक्त मुख्याध्यापक संतोष वानखेडे यांनी सांगितले.

Protected Content