जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजकमल चौक परिसरात अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करत असतांना ३० ते ३५ फळविक्रेत्यांनी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना आज घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात फळविक्रेत्यांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास राजकमल चौकातील भंगाळे गोल्ड शॉपजवळ अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दिपक चंद्रकांत कोळी गेले असता ३० ते ३५ फळविक्रेत्यांनी त्यांच्यावर दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. यात कर्मचारी दिपक कोळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत केली आहे. जखमी अवस्थेत त्यांनी शनीपेठ पोलीस स्टेशन गाठले. संबंधित हल्लेखोर फळविक्रेत्यांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.