मुंबई वृत्तसंस्था । मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी दिवसभरात नवी मुंबईत 65 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ७११ वर पोहोचला आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 52 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका प्रशासनामध्ये चिेंतेचे वातावरण आहे.
नवी मुंबईत आतापर्यंत ७९९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी मार्केट आठवडाभर बंद करण्यात आले होते. सात दिवसातनंतर मार्केट उघडल्यानंतरही एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या दोन दिवसात एपीएमसीमध्ये १४ कोरोना रुग्ण आढळले आहे. लागण झालेल्यांमध्ये एपीएमसीचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि काही व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
महापालिकेकडून एपीएमसी मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी कामगार, परप्रांतीय कामगार आणि एपीएमसी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामधून आतापर्यंत ५८४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे, एपीएमसी मार्केटमध्ये6 23 मे रोजी धक्कादायक घटना समोर आली. दहा दिवसांपूर्वी कोरोनाबाधित भाजीपाला व्यापाऱ्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलाचाही कोरोनाने मृत्यू झाला. तसेच त्या व्यापाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. ते व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे एपीएमसीमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे. आतापर्यंत एपीएमसी प्रशासनाने केलेल्या नियोजनावर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले आहे.
मुंबईत दररोज प्रवास करणारे शासकीय तसेच वैद्यकीय कर्मचारी, दीड महिना सुरू ठेवण्यात आलेली एपीएमसी बाजारपेठ, पालिका अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव, अनुभवी डॉक्टरांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्यावर पोहोचला आहे, असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर एपीएमसीमुळे नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात पसरत आहेत, असाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे.