Home Cities जळगाव ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक : जिल्हाधिकारी

ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक : जिल्हाधिकारी


जळगाव  (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असताना देखील परिस्थीतीचे गांभिर्य जिल्ह्यातील काही ग्रामस्तरीय अधिकारी उदा. तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, शिक्षक व तत्सम कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी (मुख्यालयी) राहत नसल्याबाबत जिल्ह्यातील नागरीकांकडून येणाऱ्या तक्रारी व काही माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमधून निदर्शनास आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित व्यक्ती/नागरीकांना संस्थात्मक विलगीकरण करून ठेवणे व शासकीय आदेशाचे योग्यरीतीने पालन होणे आवश्यक असल्याने सर्व संबंधित ग्रामस्तरीय अधिकारी यांनी त्यांच्या कर्तव्याच्या जागी म्हणजे मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे.

 

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या सर्व संबंधित स्थलांतरीत कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी, इतर व्यक्ती यांचे संस्थात्मक विलगीकरण शासनाच्या निर्देशानुसार योग्य पध्दतीने होणे आवश्यक आहे. संबंधितांना कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर्स वापरणे इतर जनमानसात न मिसळणे याबाबतच्या सूचना, निर्देश देण्याकरीता व संस्थात्मक विलगीकरण प्रभावीपणे राबविण्याकामी सर्व संबंधित ग्रामस्तरीय अधिकारी यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे.

ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी (मुख्यालयी) हजर राहणे आवश्यक असताना जे ग्रामस्तरीय अधिकारी मुख्यालयी राहत नसतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.


Protected Content

Play sound