शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील शेंदूर्णी सहकारी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन दगडू विष्णू पाटील यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात शेंदूर्णी येथिल संस्थेत संस्थेत शासकीय ज्वारी, बाजरी,मका खरेदी केंद्र सुरू करून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच संस्थेचे आर्थिक स्त्रोत बंद झाले असल्याने खरेदी केंद्रांच्या माध्यमातून संस्थेस ऊर्जा प्रदान करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात चेअरमन दगडू पाटील यांनी राज्यात मका खरेदी केंद्र सुरू केल्याबद्दल सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. परंतु, गेल्या चार महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे लॉक डाउन असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वानाच बसला आहे. उत्पादन समाधानकारक असूनही व्यापार ठप्प आहे व शासकीय खरेदी केंद्र चालू नसल्याने ज्वारी, बाजरी, मका हा शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आधीच आर्थिक दृष्टीने अडचणीत आलेल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने त्यांना शेतमाल कवडी मोल भावाने व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. तसेच सीसीआय कापूस खरेदी केंद्रही सहकारी संस्थेला डावलून खाजगी व्यापाऱ्याच्या जिनिंग मध्ये सुरू आहे. त्यामुळे आमच्या सहकारी संस्थेचे आर्थिक स्त्रोत बंदच आहे. तरी परिसरातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासकीय ज्वारी, बाजरी, मका खरेदी केंद्र शेंदूर्णी येथील संस्थेस मिळावे अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,जिल्हा मार्केटिंग अधिकारी व जामनेर तालुका तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या असल्याचे चेअरमन दगडू पाटील यांनी सांगितले.