जळगाव जिल्ह्यातून तीन राज्यांच्या सीमांपर्यंत 180 बसेसमधून 3 हजार 662 प्रवासी रवाना

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांच्या सीमेपर्यंत आतापर्यंत 180 बसेसच्या माध्यमातून 3 हजार 662 कामगार, मजूर यांना रवाना करण्यात आले आहे. एसटी बसमार्फत त्यांची रवानगी करण्यापूर्वी या प्रवाशांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात आल्याची माहिती एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रण राजेंद्र देवरे यांनी दिली.

 

जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आवश्यक ती कार्यवाही व खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यांनी पायी जाणाऱ्या मध्यप्रदेश, तेलंगाणा आणि छत्तीसगड या राज्यांतील मजुरांना बससेवा उपलब्ध करून दिली. या नागरिकांना फूड पॅकेट देवून रवाना करण्यात आले. तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, आरोग्य तपासणी, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.
जळगाव हा जिल्हा मध्यप्रदेश राजयाच्या सीमेवर जिल्हा असल्याने लॉकडाऊनमध्ये अडकलेले हजारो मजूर या जिल्ह्यात आलेले होते. शासनाच्या निर्णयानुसार या मजूरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजूरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी आतापर्यंत एसटी महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील विविध आगारातून 180 बसेस सोडण्यात आल्या. यामध्ये चोरवड या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत 156 बसेस, देवरी या छत्तीसगड राज्याच्या सीमेपर्यंत 23 बसेसव दिलोरा या तेलंगाणा राज्याच्या सीमेपर्यंत 1 बस याप्रमाणे गेल्या पाच दिवसात 180 बसेसमधून 3 हजार 662 प्रवासी या राज्यांच्या सीमेपर्यंत रवाना करण्यात आले. आज (14 मे रोजी) एका दिवसात मध्यप्रदेशसाठी 14 बसेसमधून 311 तर छत्तीसगडसाठी 5 बसेसमधून 111 प्रवासी रवाना करण्यात आले.

Protected Content