चाळीसगावातील ‘त्या’ नगरसेवकासह एकाला पोलिस कोठडी

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अवमान करणाऱ्या भाजपचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांच्यासह त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ०५ मे २०२० रोजी शहरातील देवकर मळा भागातील रात्री २३:१५ वाजता झालेल्या भांडणाच्या कारणाने फिर्यादी श्रीमती पाटील यांचे दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहरातील नगरसेवक व त्याचे ५ कुटुंबीय अशा विरोधात तक्रार देण्यात आली होती. यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या बॅनरचा उपयोग मजुरांच्या प्रसाधनगृहासाठी केला व महाराजांच्या फोटोची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्या तसेच याचा जाब विचारला असता आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलांना तलवारीने वार करीत मारहाण केली व फिर्यादीचे कपडे फाडून तिचा विनयभंग करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात आला होता. या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा क्र १६७/२०२० कलम ३०७,३५४,३२४,२९५ ए सह इतर अन्वये राजेंद्र रामदास चौधरी व इतरांसह दिनांक ६ मे २०२० रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयितांच्या शोधासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते, परंतू त्यांचा काही एक ठावठिकाणा लागत नव्हता. तरी आज रोजी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीस गाव तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकविजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष रोही, सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, सहायक फौजदार भोसले, पोलीस अंमलदार गणेश पाटील, अभिमन पाटील, नितीन पाटील, पोना संदीप पाटील,पंढरीनाथ पवार, भटु पाटील, संदीप पाटील, राहुल गुंजाळ, सतीश राजपूत, भूषण पाटील, दीपक पाटील, गोपाळ बेलदार, विनोद खैरनार या पथकाने संबंधीतांच्या मुसक्या आवळल्या. या पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे आज रोजी मध्यरात्री चाळीसगाव शहरापासून १८ किमी दूर असलेल्या बहाळ गावाच्या शिवारात रोडपासून तीन किलोमीटर दूरवर असलेल्या मक्याच्या शेतात फरार संशिंयत राजेंद्र रामदास चौधरी लपून बसल्याची माहिती प्राप्त झाली होती. यानुसार राजेंद्र चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर याच प्रकरणी गुन्हा दाखल असणारे राहुल राजेंद्र चौधरी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

संशयित आरोपी नगरसेवक राजेंद्र चौधरी आणि त्याचा मुलगा राहुल राजेंद्र चौधरी दोघांना आज न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content