चाळीसगाव प्रतिनिधी । बेलगंगा साखर कारखान्याची ट्रायल यशस्वी झाली असून आम्ही आता पुढील हंगामासाठी सज्ज असल्याची माहिती आज चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली आहे.
चाळीसगाव तालुक्याचा आर्थिक आत्मा असलेला बेलगंगा सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने या कारखान्याचे मशिनरी तसेच बांधकाम शेड हे अनेक वर्षापासून पडून होते. या आजारी असलेल्या या कारखान्यास जिल्हा बँकेकडून लिलावाद्वारे घेऊन अंबाजी ग्रुप ने कारखान्याच्या चालू करण्याच्या रस्त्यातील अनेक दिव्य पार करीत कारखाना सुरू केले. यानंतर आज ५०००० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ट्रायल बेसेसवर घेतलेले सीजन यशस्वी पार पाडल्याचे आज कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कारखाना सुरू केल्यानंतर मशनरी मधील बिघाड कारखाना सुरू झाल्यानंतर बिघाड होऊन बारा तास चालायचा किंवा दोन तासातच बंद पडायचा. आता मात्र या सगळ्या दुरुस्त्या करीत आज उत्तम प्रकारची साखर गाळप करून संपूर्णपणे २४ तास चालण्याची क्षमता कारखान्याची झाली असून पुढील हंगामात पूर्ण क्षमतेने सीजन पार पाडण्यासाठी बेलगंगा कारखाना सज्ज झाले असल्याचे चित्रसेन पाटील म्हणाले. दरम्यान, बेलगंगातून पुन्हा उत्पादन सुरू होणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कामगार व्यापारी यांच्यामध्ये पुढील काळासाठी आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.