विधानपरिषद निवडणूक: मुख्यमंत्री ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई वृत्तसंस्था । विधानपरिषदेच्या रिक्त नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब येऊन विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

मतांचं गणित पाहून काँग्रेसने दुसऱ्या जागेचा हट्ट सोडल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर भाजपने चार जागांवर दावा केला आहे. संख्याबळ पाहता महाविकास आघाडी पाच आणि भाजपच्या चार जागा निवडून येतील, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांचे अर्ज यापूर्वीच भरले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार आज आपले अर्ज दाखल करत आहेत. एकूण ९ जागांपैकी शिवसेना २, राष्ट्रवादी २ आणि काँग्रेस १ तर भाजप ४ जागा लढवणार आहे.

Protected Content