नई दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला वेगवेगळ्या पातळ्यांवर अडचणीत आणले आहे. यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी भारत पाकिस्तानला संपवून टाकू शकतो अशी भीती वक्त केले आहे. जर पाकिस्तानने भारतावर एकही अणुबॉम्ब टाकेल तर भारत पाकिस्तानवर 20 अणुबॉम्बने हल्ला करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘डॉन’ या पाकिस्तानी वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाककडून तर अणुहल्ल्याच्याही वल्गना होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुशर्रफ यांनी पाक सरकारला युद्धाच्या संभाव्य परिणामांची जाणीव करून दिली आहे. ‘पाकिस्ताननं एक अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकला बेचिराख करेल. भारताला ती संधी द्यायची नसेल तर त्यांनी २० अणुबॉम्ब टाकण्याआधी आपण त्यांच्यावर ५० अणुबॉम्ब टाकून हल्ला केला पाहिजे. पण आपली ती तयारी आणि क्षमता आहे का? असा प्रश्न उपस्थित करतानाच, मुशर्रफ यांनी दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. भारत-पाकिस्तान संबंध धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहेत. दोन्ही देश अण्वस्त्रांचा वापर करणार नाहीत असेही मुशर्रफ म्हणाले आहेत. आपण भारताविरोधात अण्वस्त्र वापरले तर भारत 20 अणूबॉम्ब टाकून पाकिस्तानला संपवेल असे मुशर्रफ म्हणाले.