जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास कांदा वाहून नेणार्या एका ट्रकला लागलेल्या आगीत हा ट्रक जळून खाक झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, मध्यरात्रीच्या सुमारास उत्तरप्रदेशातील आझमगड येथे कांदा घेऊन जाणार्या ट्रकला महामार्गावर अचानक आग लागली. यातील ड्रायव्हर व क्लिनरने प्रसंगावधान राखून गाडी थांबवत खाली उड्या मारल्या. काही क्षणातच ट्रकला भीषण आग लागली हे वृत्त समजताच नशिराबाद येथील काही जणांनी महामार्गावर धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तथापि, याला यश न आल्याने हा ट्रक जळून खाक झाला. यात ट्रकमध्ये असणारा सुमारे तीन लाख रूपयांचा कांदा देखील जळाला. शेवटचे वृत्त हाती आले तोवर याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.