सृष्टीचे आपण काळरुपी पाहुणे, मालक नव्हे ! (ब्लॉग)

कोरोनामुळे संपूर्ण जगात अक्षरश: हाहाकार उडाला आहे. विज्ञानाने निसर्गावर विजय मिळवण्याच्या अहंकारात असणार्‍या मानवाला या विषाणूने जोरदार धक्का दिला आहे. यातच आज जागतिक वसुंधरा दिवस ! याचे औचित्य साधून या सर्व बाबींचे विवेचन केलेय लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल.

…….विनाशातून तारून नेणारी शक्ती म्हणजे प्रेम, तारक मार्ग हा प्रेमातूनच जातो किंबहुना प्रेमात असतो. ज्या व्यक्ती जवळ सार्‍या जगात आपले असे म्हणण्यासारखे काहीही नसेल, त्याला देखील आपल्या प्रिय व्यक्तींच्या चिंतनात काही क्षण का होईना, निर्भेळ प्रेमाचा आनंद घेता येतो.अश्या निर्भेळ आनंदाची ओढ अथवा आठवण कोरोना या महामारीने प्रत्येक संवेदनशील मनाला करून दिली आहे.

कधी नव्हते जवळपास जगभरातील मानव समाज आपल्या घरातच जेरबंद झाला आहे. रस्त्यावरील वरदळ थांबली आहे,वातावरण कसं स्तब्ध झालंय, हवेतील प्रदूषण ही कमी झालेय. ही पृथ्वी,जल,वायू आणि आकाश तुम्ही नसला तरी सुरळीत व सुखात असतात,तुमच्या वाचून निसर्गाचं काहीच अडत नाही. तुम्ही (माणसं ) असणं नसणं हे निसर्गाच्या दृष्टीने फारसं महत्वाचं नाही, हे च निसर्गाने या निमित्ताने सिद्ध केलेय, या बरोबर कोविड १९ या व्हायरसने अख्या जगातील माणसांची औकात काय आहे, हे दाखवून दिल आहे. आता आपल्याला कळून चुकलंय की, सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि उपभोग या गोष्टी कुचकामी आहेत. जगण्यासाठी ओंजळीत मावेल एवढच अन्न, तेवढंच पाणी आणि प्राणवायू पुरेसे आहे, या पेक्षा काही ही नको. मानवप्राणी वगळता उर्वरित विश्‍वाचा गाडा मात्र पूर्ववत सुरळीत चालू आहे. त्याने बंदिस्त केलय फक्त मानवजातीला. मला वाटतेय कोरोनाच्या माध्यमातून निसर्गाने आपल्याला आपल्या औका ती संदर्भात एक संदेश दिला आहे.

न्यूयॉर्कचा दिमाख उतरलाय, पॅरिसचा सगळा श्रुंगार ओसरलाय. अन चीनची अभेद्य भिंत पूर्ववत राहीलेली नाही. जल, थल आणि नरसंहाराने भरलेला मानवाचा इतिहास स्तब्ध झालाय. नेता, अभिनेता असो की शेटजी सर्वांचा गर्व हिरावला गेला आहे. पैशांची किंमत ओसरली आहे. धन दौलत पेक्षा जीवनाचे मोल मोठे आहे. माणसांच्या गरजा कधीच सम्पत नाही, हा गैरसमज आहे व तो निसर्गाने उत्तमरीत्या या निमित्ताने समजावून सांगितले आहे. त्याच बरोबर जगाचा पोशिंदा बळीराजाच आहे हे सिद्ध झाले असून शेतकरी राजाचे महत्व सगळ्या जगाला कळू लागले आहे. जगायला सुरक्षित ठिकाण, खायला अन्न आणि मायेची माणसं लागतात.

समृद्धीत प्रसवलेला हा भयावह काळ आहे. आज जरी भौतिक सुखासाठी लागणारी संपदा अधिकाधिक लोकांकडे वाढत्या प्रमाणात उपलब्ध असली तरी आपण कश्यासाठी जगतोय हा प्रश्‍न त्यांच्या मनाला सतावीत आहे. भौतिक उदंडतेच्या सागरात अर्थपूर्ण जीवनाची तहान, तहानलेलीच आहे. म्हणून अंतर्मुख व्हायची वेळ झालीये,स्वतःकडे पहाण्यासह मानवीय समाजाकडे पहाण्याची वेळ आली आहे,उर्वरीत वेळेचा सक्षम सदुपयोग करायची वेळ झाली आहे.

सवेरा और उजाला तब नही होता,
जब सूर्योदय होता है,
उसके लिये आंखे भी खोलनी पडती है..!

सुरेश उज्जैनवाल

Protected Content