कराड (वृत्तसंस्था) मनव (ता. कराड) येथे एका मजुराने गावातील व्यक्तीच्या शेतातील ऊस तोडणीच्या कारणावरून आपल्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घाली आहे.
लाला शहाजी डावरे (वय ३४, सध्या रा. मनव, ता. कराड, मुळ रा. गिरवली, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे पत्नीच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. तर सारिका डावरे असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. ऊस तोडीसाठी गिरवली (जि.उस्मानाबाद) येथून ऊसतोड कामगार आले आहेत. ते मनव येथे थांबले आहेत. या कामगारांपैकी सारिका डावरे व लाला डावरे या पती-पत्नीमध्ये बुधवार रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भांडण लागले. त्यांच्यामध्ये गेली दोन-तीन दिवसांपासून गावातील पाटलांचा ऊस तोडण्याच्या कारणावरून वाद होता. त्याच कारणावरून बुधवारी रात्री पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी पती लाला डावरेने लाकडी दांडके पत्नी सारिका डावरेच्या डोक्यात घातले. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. इतर ऊसतोड मजुरांनी त्यांना उपचारासाठी त्वरित कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलविले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.