किरण बारींचा प्रामाणिकपणा; रोख रक्कम व कागदपत्रे केले परत

चोपडा प्रतिनिधी । येथील बारी समाज पंच मंडळाचे माजी अध्यक्ष किरण बारी यांना सापडलेले ५६ हजाराची रोख रक्कम आणि कागदपत्रे मुळ मालकाला परत केले. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, बारीवाड्यातील रहिवासी किरण प्रकाश बारी हे १२ रोजी आपल्या कामानिमित्त शहर पोलिस ठाण्याच्या आवारात आले होते. काम आटोपून घरी परत जात असतांना आपल्या मोटरसायकलीला एक पिशवी अडकवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पिशवी तपासली असता त्यात रोख व रु. ५६ हजार, २ चेकबुक, पासबुक व काही कागदपत्रे असल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पिशवीसह सरळ पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी सदर पिशवी पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी पिशवीतील कागदपत्रांच्या आधारे धानोरा (ता. चोपडा) येथील पोलिस पाटलांशी संपर्क साधत कोमलदास प्रल्हाद महाजन यांच्या विषयी चौकशी करत पिशवीबद्दल माहिती दिली. रोख रक्कम, कागदपत्रे हरवल्यामुळे हवालदील झालेल्या कोमलदास महाजन यांनी पोलिस ठाणे गाठले. दरम्यान पोलिसांनी आपली पंचनाम्याची कारवाई पूर्ण केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, तलाठी किरण पाटील यांच्या उपस्थितीत पिशवी रोख रक्कम व कागदपत्रांसह मूळ मालकाच्या हवाली केली. किरण बारी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पो. नि. व कोमलदास महाजन यांनी कौतुक केले.

Protected Content