जळगाव प्रतिनिधी । एकमेकांविरूध्द टोकाच्या लढाईच्या वल्गना करणार्या शिवसेना व भाजपची अखेर युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची दुभंगलेली मने कशी सांधली जाणार हा खरा प्रश्न आहे. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असला तरी आता युती झाल्यामुळे लोकसभा आणि त्यापश्चातच्या विधानसभा निवडणुकीत हिशोब नेमका कसा चुकता होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक शिवसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष
तब्बल २५ वर्षांपर्यंत अक्षरश: खांद्याला खांदा लाऊन आगेकूच करणार्या शिवसेना व भाजपमधील मैत्रीला पाच वर्षांपूर्वी नजर लागली. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत बहुमतामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने विधानसभेत युती न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात, निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत आली तरी पंचवीस वर्षांचा सलोखा या पाच वर्षांमध्ये पार धुळीस मिळाल्याचे दिसून आले. आज पुन्हा या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने हातमिळवणीची घोषणा केली आहे. तथापि, या दोन्ही पक्षांमधील वाद खूप विकोपाला गेल्याने दुभंगलेली मने कशी कशी जुळणार हाच खरा प्रश्न आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथराव खडसे अथवा त्यांच्या कुटुंबातील कुणालाही उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांचे काम करणार नसल्याचा इशारा कालच शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भुसावळ व वरणगाव येथील बैठकांमध्ये दिला आहे. आता खडसे यांच्या कुटुंबातच भाजपचे तिकिट मिळण्याची शक्यता सर्वाधीक असल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी घरात बसून राहणार, पडद्याआडून विरोधकांना मदत करणार की उघडपणे त्यांचा विरोध करणार? हे पाहणे फारच औत्सुक्याचे ठरणार आहे. आणि लोकसभा निवडणुकीत जर शिवसेनेने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर दस्तुरखुद्द एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे नेते याचा कसा प्रतिकार करणार? याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
विधानसभेच्या निवडणुकीवरही परिणाम
अर्थात, युतीतील धुम्मस ही फक्त लोकसभेपुरतीच मर्यादीत नसून याला आगामी विधानसभा निवडणुकीचेही कंगोरे आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार याला तपासून पाहिले असता, अनेक मनोरंजक बाबी दिसून येतात. रावेर लोकसभेच्या अंतर्गत येणार्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप हा पक्ष शिवसेनेपेक्षा प्रबळ असला तरी काही मतदारसंघांमध्ये धनुष्यबळ प्रबळ असल्याचे दिसून येते. मुक्ताईनगर मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांच्याविरूध्द शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचा सामना चांगलाच रंगला होता. चंद्रकांत पाटील हे पुन्हा विधानसभेची तयारी करत असले तरी युतीमुळे हा मतदारसंघ भाजपला सुटणार ही बाब उघड आहे. यामुळे ते खडसे यांना कसा प्रतिकार करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शेजारच्याच मलकापूर मतदारसंघातही भाजपला शिवसेनेचा प्रखर विरोध आहे. यामुळे युती झाली तरी हे दोन्ही पक्ष एकमेकांना धडा शिकवण्याची एकही संधी सोडणार नाही हे उघड आहे. चोपडा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी आजवर भाजपशी टोकाचा विरोध घेतला नाही. तथापि, त्यांच्या विरूध्द असणारा माजी आमदार कैलास पाटील यांचा गट मात्र भाजपला तीव्र विरोध करण्याची शक्यता आहे.
भुसावळातही पेच
कधी काळी शिवसेनेची अतिशय प्रबळ ताकद असणार्या भुसावळात आता हा पक्ष तसा दुबळा झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, युती असतांना २००९ च्या निवडणुकीपर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. याच मतदारसंघावरून २०१४ साली युती तुटल्याचे बोलले जात होते. यामुळे शिवसेनेने या मतदारसंघावर दावा सांगितला तर संजय सावकारे यांचे काय ? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यावल-रावेर आणि जामनेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद मर्यादीत असल्यामुळे येथून भाजपला फारसा धोका निर्माण होण्याची चिन्हे नाहीत. मात्र जर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकजुट दाखविली तर युतीतील दोन्ही पक्षांनीही याच प्रकारे एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा याचा दोन्ही पक्षांचा फटका बसू शकतो. सद्यस्थितीचा विचार केला असता, भुसावळ आणि मुक्ताईनगर या दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये उघड वा छुपी लढाई रंगू शकते. तर इतर ठिकाणी धुसफुस सुरूच राहण्याची शक्यता आहे. याचा व्यापक दृष्टीने विचार केला असता, राष्ट्रीय व राज्य पातळीवर युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मने जुळण्याची शक्यता तशी धुसरच आहे.