मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर मतदार संघासाठी औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती. आता लवकरच मुक्ताईनगर औद्योगिक वसाहत निमिर्तीसाठी सारोळा, निमखेडी आणि हरताळा या परीसरात जमिनीची पाहणी केली.
मतदार संघातील तरुण शिक्षीत बेरोजगारांना आपल्याच मतदार संघात रोजगार मिळावा, बेरोजगारांना रोजगारासाठी वणवण भटकावे लागू नये. यासाठी मतदार संघातच एमआयडीसी स्थापन व्हावी व बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आ.चंद्रकांत पाटील हे शिवसेना जिल्हाप्रमुख असतांना पासुनच कायम धडपड करीत आहेत. अनेकदा सभांमधून त्यांनी हा विषय बोलून दाखविला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार यांचा नुकताच शेतकरी दौरा मुक्ताईनगर शहरात पार पडला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी एमआयडीसीची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
मा.मुख्यमंत्री साहेबांनी यावर तात्काळ अॅक्शन घेत तसे शासानाचे जागा पाहणीचे पत्र नुकतेच प्रशासनाला प्राप्त झाल्याने आज दिनांक 28 रोजी एमआयडीसी क्षेत्र व्यवस्थापक, जळगाव श्री.बी.डी.पारधी, वरिष्ठ भुमापक आर.डी.बकरे, भुमापक श्री. एकनाथ ठाकरे यांनी सारोळा, निमखेडी, हरताळे शिवारातील नियोजित जमीनीची एमआयडीसी स्थापनेसाठी पुर्व पहाणी केली तसेच, पाणी, विज, वाहतुक, इ. उपलब्ध सुविधां विषयी माहीती जाणून घेतली. तसा अहवाल वरिष्ठांनी मागवला असून वरीष्ठांना पुढील जागा पहाणी अहवाल सादर केला जाईल व पुढील कारवाई ही वरिष्ठ स्थरावरुन करण्यात येईल असे एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक बी.डी. पारधी यांनी शासकीय विश्राम गृह,मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. जमिन पहाणीस्थळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटु भोई शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, अनंतराव देशमुख, संचलाल वाघ, उज्वल बोरसे तुषार बोरसे, संतोष कोळी यांची उपस्थिती होती.