नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली हिंसाचारातील जखमींपैकी आणखी ११ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३८ वर पोहचला आहे. दरम्यान, याप्रकरणी ४८ गुन्हे दाखल असून १३६ दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली हिंसाचार सुनियोजित कटाचाच एक भाग असल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी केला होता. दंगलग्रस्त भागात अनेक ठिकाणी मोठ्या गुलेरसारखे पेट्रोल बॉम्ब लाँचर, पेट्रोल बॉम्ब, दगड-गोटे, अॅसिड पाऊच सापडल्याने सुनियोजित कटाच्या शंकेला बळ मिळते. त्यामुळे सर्व प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेच्या दोन एसआयटी करणार आहेत. दरम्यान, प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या तीन भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधीची सुनावणी दिल्ली हायकोर्टाने चार आठवड्यांसाठी तहकूब केली. बुधवारी न्या. एस. मुरलीधर आणि तलवंतसिंग यांच्या पीठाने पोलिसांना गुरुवारपर्यंत गुन्हे दाखल करण्याविषयी निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. रात्री उशिरा न्या. मुरलीधर यांच्या बदली करण्यात आली.