नागपूर। भीम आर्मी संघटनेला नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर कार्यकर्ता मेळावा घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाने दिला असून यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
भीम आर्मीच्या २२ फेब्रुवारी रोजी रेशमबागेत होणार्या मेळाव्याला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या आक्षेपावरून पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज भीम आर्मीला सशर्त परवानगी दिली आहे. कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक विधान करण्यास तसेच या ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यास उच्च न्यायालयाने मज्जाव केला असून हा कार्यक्रम दुपारी २ ते दुपारी ५ वाजेपर्यंतच घेण्यात यावा असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या अटींचे पालन करू अशा लिखित हमी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने घातलेल्या अटींचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हेगारी कायद्यासह न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणीही कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमिवर, आता या मेळाव्यातील आझाद यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.