लखनऊ वृत्तसंस्था । केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन केली तर मग मशिदीसाठी का नाही असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.
दिल्लीत आज राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील पक्षाच्या राज्य परिषदेत बोलतांना शरद पवार यांनी याच मुद्याला हात घातला. राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन केली. पण मशिद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवली नाही? देश तर सर्वांचा आहे आणि सर्वांसाठी आहे, असं म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार जर मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करू शकतं तर मशिदीसाठी निधी उभारून ट्रस्ट का स्थापन करत नाही? असा प्रश्न पवारांनी केला. भाजपचं फूटीचं राजकारण करत आहे. सीएए हे त्याचं उघड उदाहरण आहे, असं पवार म्हणाले. जनता भाजपला कंटाळली आहे. भाजपने दिल्लीत संपूर्ण शक्ती पणाला लावली. पण भाजपचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात आम्ही एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून पायउतार केलं. तसंच केंद्रातही भाजपविरोधी पक्षांनी एकजूट होऊन भाजपला सत्तेतून हद्दपार करावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवीन वाद सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.