नवी दिल्ली । अरविंद केजरीवाल यांनी आप सरकारच्या शपथविधीसाठी शिक्षकांना उपस्थितीचे निमंत्रण दिल्यावरून भाजप व काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.
आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल रविवारी तिसर्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथ ग्रहण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यासाठी दिल्लीच्या शिक्षण संचालनालय एक सर्क्युलर जारी करून सरकारी शाळेच्या शिक्षक आणि मुख्याधापक, अधिकार्यांना शपथ ग्रहण सोहळ्यात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वच मुख्याध्यापक २० शिक्षकांसह उपस्थित राहण्याची सूचना संचालनालयाच्या ऑफिसला १५ फेब्रुवारीपर्यंत पाठवून द्या. त्यानंतर त्याची एक कॉपी प्रवेश दारावर हजेरी तपासणार्या संबंधित अधिकार्याला पाठवून द्यावी. सर्वांनाच आयडी कार्ड घेऊन येण्यास सांगितलं आहे. १६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता शपथ ग्रहण कार्यक्रमाला यावे असे निर्देश यात देण्यात आले आहेत.
यावरून भाजप व काँग्रेसने टीका केली आहे. आपकडे आमदार भरपूर आहेत, परंतु जनतेचा पाठिंबा नाही. शपथ ग्रहण सोहळ्यात लोक येणार नसल्याची त्यांना भीती आहे, म्हणूनच त्यांनी ३०,००० शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी टीका भाजपाचे स्थानिक प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी केली आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते मुकेश शर्मा यांनी ट्विटरवरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारी शाळेच्या शिक्षकांना केजरीवालांच्या शपथविधीला येण्यास सांगितलं आहे. शपथ ग्रहण सोहळ्यात गर्दी जमवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला जातोय, असे ट्विट त्यांनी केले आहे.