जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड जळगांव ही सहकारी शिक्षण प्रशिक्षण प्रचार प्रसिद्धीचे कार्य करणारी सहकारी प्रबोधिनी असून आज रोजी जिल्हा सहकारी बोर्ड लि. अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. बारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रदीपदादा रामराव देशमुख यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रदीपदादा रामराव देशमुख यांचे एकमात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले यात सुचक म्हणून जिल्हा सहकारी बोर्डाचे उपाध्यक्ष सतीश परशुराम शिंदे तर जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक आनंदराव रामराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. यावेळी जिल्हा बोर्डाचे संचालक सुदाम पाटील, आनंदराव देशमुख, प्रा. मनोहर संदानशिव, हेमंतकुमार साळुंखे, प्रवीणभाई गुजराथी आदी उपस्थित होतेत
स्व. आण्णासाहेब बापूराव देशमुख यांनी सहकारी बोर्डाला वैभव प्राप्त करुन दिले असून त्यांच्याच धोरणात्मक बाबींचा विचार लक्षात घेता यापुढील कार्यकाळात सहकारी बोर्डामार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येवून सहकाराला नवसंजीवनी प्राप्त करुन देणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक सुदाम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक अनिल शिसोदे यांनी केले.
नूतन अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख हे चाळीसगाव विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष, व्यापारी देखरेख संघ अध्यक्ष, बाजार समिती संचालक म्हणून कार्यरत असून बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तसेच जळगांव जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून यापूर्वी काम पाहिलेले आहे.