जळगावात तरुण डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । रिंगरोड येथील हरेश्वरनगरात खोली करुन राहणाऱ्या एका तरुण डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

विजय नारायण जाधव (वय २४, मुळ रा.बोरगाव कसारी, ता.सिल्लोड, औरंगाबाद) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. जाधव हे अविवाहित असून साकेगाव येथील होमिओपॅथी महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करीत होते.
गेल्या चार वर्षांपासून डॉ.जाधव हे हरेश्वर नगरात भाड्याच्या घरात राहत होते .  सुरूवातीला त्यांच्यासोबत काही रुममेट होते. तर गेल्या तीन महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. बुधवारी ते खोलीत मोबाईलवर इअरफोन लावून बोलत असताना अचानक त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर अर्ध्या तासात त्यांचे मित्र डॉ.गरीष अरुण पाटील हे घरी गेले असता डॉ.जाधव दरवाजा उघडत नव्हते. तसेच मोबाईल देखील रिसीव्ह करीत नसल्यामुळे डॉ.पाटील यांनी खिडकीतून डोकाऊन पाहिले असता डॉ.जाधव यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर डॉ.पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच डॉ.जाधव यांच्या मित्रांकडून माहिती घेत त्यांच्या कुटंुबियांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content