क्रीडा, राष्ट्रीय

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव : मालिकाही गमावली

शेअर करा !

 

ऑकलंड, वृत्तसंस्था | टी-२० मालिकेत ५-० असा विजय मिळवत नवीन वर्षात पहिल्या परदेश दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑकलंड येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतावर २२ धावांनी मात करत वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले २७४ धावांचे आव्हान भारतीय संघाला पेलवले नाही. भारताकडून श्रेयस अय्यर आणि अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा-नवदीप सैनीने फटकेबाजी करत चांगली झुंज दिली…पण त्यांचे प्रयत्न अपुरेच ठरले.

  • advt tsh flats
  • spot sanction insta

 

पहिल्या वन-डे प्रमाणे दुसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी निराशा केली. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी झटपट माघारी परतली. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही या सामन्यात निराशा केली. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने सर्वप्रथम शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर नवदीप सैनीसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचे आव्हान कायम ठेवले. मात्र अखेच्या षटकांत फटकेबाजीच्या प्रयत्नात भारताने विकेट फेकत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. जाडेजाने ५५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही या सामन्यात ५२ धावा केल्या. याव्यतिरीक्त इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले.
त्याआधी, रॉस टेलर आणि कायन जेमिन्सन यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन-डे सामन्यात २७३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत ऑकलंडच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मात्र अखेरच्या षटकांमध्ये न्यूझीलंडने फटकेबाजी करत आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यात यश मिळवले. युजवेंद्र चहल-शार्दुल ठाकूर जोडगोळीने मधल्या फळीत दमदार मारा करत न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश लावला.
नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करीत पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. अखेरीस अनुभवी रॉस टेलरने कायल जेमिन्सनच्या साथीने फटकेबाजी करत आपले अर्धशतक साजरे केले. टेरलच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडने २७३ धावांचा टप्पाही गाठला. रॉस टेलरने नाबाद ७३ धावांची खेळी केली. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, शार्दुल ठाकूरने २ तर रविंद्र जाडेजाने १ बळी घेतला. न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावबाद झाले.