जळगाव प्रतिनिधी । येथील ह.भ.प. तोताराम महाराज नवचैतन्य लेवा पाटीदार समाज मंडळातर्फे शेतकरी ,व्यावसायिक व नोकरदारांसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
येथील बाबा हरदासराम मंगळ कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, राजेंद्र राणे, यतीन ढाके, ह.भ.प. धनराज महाराज, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ जळगावचे रामभाऊ पवार, संजय मराठे, उज्ज्वल चौधरी, लालजी पाटील, अशोक पाटील, अॅड. प्रकाश पाटील, प्रल्हाद भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भंडारा येथील हरिशचंद्र बांडेबुचे, देविदास सूर्यवंशी, कार्तिक लांजेवार, अमित उरफुडे, कुंवरलाल बहेकर यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, नोकरीवाल्या मुलाची अपेक्षा करून त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा दुसर्यांना नोकरी देणार्या अर्थात व्यावसायिक मुलाशी लग्न करा. मुलींनी लग्न करताना सरकारी नोकरी असलेल्या मुलाचा विचार करताना आपल्या घरात किती नोकरदार आहे याचा विचार करावा, आपले संस्कार जपत जातीत विवाह करण्यास प्राधान्य द्यावे. मुली जेव्हा पळून जावून लग्न करतात तेव्हा त्यांना वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी करणार्या आई-वडीलांवर काय बितत असेल याचाही विचार करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले की, सामूहिक विवाह ही काळाची गरज बनली आहे. पालकांनी देखील विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या मुला-मुलींचे लग्न जमवावे. तसेच समाजाच्या शिरसोली रोडवरील हॉलचा प्रश्न येत्या पंधरा मार्गी लावण्यात येईल. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वधू-वर सूचीचे प्रकाशन करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी अध्यक्षीय भाषण करतांना समाजाच्या सभागृहासाठी मदत करण्याचे आवाहन केले तसेच समाजबांधवांनी एकजुट व एकसंघ राहीले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष हेमंत भंगाळे यांनी करतांना मंडळाचे उपक्रमांची माहिती दिली. सुत्रसंचालन प्रा.डॉ.कल्पना भारंबे, देवयानी कोलते, व स्वाती भंगाळे यांनी केले. आभार शशिकांत फेगडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मणिकर्णिका महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, युवक मंडळ , शक्ती महाजन, शशिकांत फेगडे, किशोर कोलते, निताताई वराडे, पूनम सावदेकर, सीमा फेगडे, वैशाली बर्हाटे, वैष्णवी भंगाळे, प्रशांत महाजन, अर्चना भंगाळे, श्शिर भंगाळे, कविता कोलते, मयूर लोखंडे, माधुरी लोखंडे, होमाजी भंगाळे, वसंत कोलते, योगेश फेगडे, स्वप्निल खडसे यांसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास जळगाव जिल्ह्यासह, नाशिक, मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद, निपाणा , मलकापूर, सुरत,वापी, इंदूर आदी ठिकाणाहून समाजबांधव आले होते.
जळगाव जिल्ह्यात जवळपास सर्वच समाजात विदर्भातुन मुली सुना म्हणून आणल्या जात आहेत. परंतु यात काही मध्यस्थी करत असतात. असे विवाह जोडणे काही जणांचा व्यवसायच झालेला आहे. परंतु या मेळाव्यात भंडारा येथील विविध समाजाच्या मुलींनी आपला परिचय करुन दिला. तसेच विवाहासाठी जोडीदार कोणत्याही समाजाचा चालेल फक्त तो र्निव्यसनी असावा. शेतकरी जोडीदारही चालेल असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे असा परिचय मंचावरुन करुन देणार्या बहुतांश मुली उच्च शिक्षीत होत्या. समाजात मुलींची कमतरता असल्याने विदर्भातील मुलींशी विवाह केला जात असतो. या मंडळाचे अध्यक्ष हेमंत भंगाळे यांनी थेट भंडारा येथील उपवर मुली व त्यांच्या पालकांनाच येथे निमंत्रित केले होते. उच्च शिक्षीत या मुलींनी आपला परिचय करुन दिला.