सातारा (वृत्तसंस्था) मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा कुणी नीट अभ्यास केला तर त्यांना हे ज्ञात होईल की, जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. परंतू रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते. राजमाता जिजाऊ या त्यांच्या गुरु होत्या. तर छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वाद निर्माण झाला असताना यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा जाणता राजा असा होणारा उल्लेखही आक्षेपार्ह असल्याचे म्हटले होते. त्यांच्या आधी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील याच मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज श्री.पवार बोलले आहेत. शरद पवार बुधवारी सातारा दौऱ्यावर आहेत. तेथे ते बोलत होते. ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद सुरू झाल्यानंतर त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आज सातारा येथील सभेत शरद पवारांनी वरील विधान करून या विषयाला पुन्हा तोंड फोडले आहे.