बुलढाणा प्रतिनिधी । ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’च्या गोड शुभेच्छा देणाऱ्या मकरसंक्रातीच्या सणाच्या तयारीसाठी बुलढाण्यातील मार्केट फुलून गेले आहेत. शहर आणि उपनगरातल्या मार्केटमध्ये भोगी आणि संक्रातीसाठी लागणाऱ्या चीजवस्तू दाखल झाल्या आहेत. सुगडी, साखरेचा हलवा, तिळगुळाचे लाडू, काळ्या रंगाचे कपडे, वाण देण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमतींमध्ये गेल्या वर्षापेक्षा वाढ झालेली दिसते.
सुगडीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरामध्ये यावर्षी वाढ झालेली दिसते. ऊस, चणे यांच्या किंमती वाढल्या आहेत. ऊस, बोरांच्या किंमतीमध्येही गेल्या वर्षापेक्षा वाढ झालेली दिसते.
संक्रातीमध्ये हलव्याच्या दागिन्यांचे विविध प्रकार यंदा पाहायला मिळाले. पारंपारिक हार, कानातले, बाजूबंद, गळ्यातल्यासोबत बांगड्या, पाटल्या, तोडे यामध्ये वेगळेपण दिसून येते. लहान मुलांच्या दागिन्यामध्ये बासरी, मुकुट यासह हातातली वाळी, कडे, गळ्यातले हारही उपलब्ध आहेत. वाण देण्यातील वैविध्य प्रत्येक वर्षी मकरसंक्रातीच्या वेळी देण्यात येणारे वाण वैविध्यपूर्ण असावे, अशी इच्छा अनेकींची असते. यंदा खणाचे ब्लाऊजपीस, तांब्याचे पाणी पिण्याचे ग्लास, रंगबिरंगी बांगड्यांचे सेट, मोबाल कव्हर, कापडी पिशव्या असे वैविध्य यात दिसते.
तिळगूळ महागले :- यावर्षी दोन प्रकारच्या साध्या तिळाच्या किंमती, पॉलिश तीळ १७०-१८० रु. ते तर साधी तीळ १३०-१४० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
काळ्या रंगाची जादू :- संक्रातीच्या निमित्ताने बाजारामध्ये काळ्या रंगाची जादू दुकानांमद्ये दिसून येत होती. काळ्या रंगाचे कपडे दुकानांमधून डोकावत होते. इमिटेशन ज्वेलरीमध्येही काळ्या कपड्यांसोबत घालण्यासाठी काळ्या रंगाचे दागिने मॅचिंग करून घेतले जात होते. संक्रातीच्या दिवसांत नव्हे तर संपूर्ण जानेवारी महिन्यात काळ्या रंगाचे कपडे खूप वापरले जातात, मातीचे सुगडे याला मकर संक्रातीमधे विशेष महत्व असते.