संसदेत टॉप-१० खासदारांत महाराष्ट्रातील सहा जण : सुप्रिया सुळे अव्वल

mp supriya sule said do not politics in education sector 730X365

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या आहेत. लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तसेच विविध मुद्द्यांवरील चर्चेतील सहभागाबाबत ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रीसर्च’ या संस्थेने केलेल्या पाहणीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यानंतर सुभाष भामरे हे दुसरे सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार ठरले असून ‘टॉप टेन’ खासदारांत महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे.

 

संसदीय अधिवेशनांमध्ये मे ते डिसेंबर २०१९ या काळात सुप्रिया सुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभेत एकूण १६७ प्रश्न उपस्थित केले तर विविध राष्ट्रीय विषयांवरील ७५ चर्चांमध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना राज्यातील जनतेचे तसेच महिलांचे प्रश्न त्या नेहमीच हिरीरीने संसदेत मांडत आल्या आहेत. याबाबत विचारले असता ‘सरकारला प्रश्न विचारणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच प्रश्नोत्तराच्या तासाच मी सर्वात जास्त सक्रिय असते’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. बारामती मतदारसंघातून त्या सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत.

विशेष म्हणजे लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पहिल्या १० खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदार असून त्यात सुप्रिया सुळे अव्वलस्थानी आहेत. या यादीत कर्नाटक, अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. सुप्रिया सुळे यांच्यानंतर सत्ताधारी भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांत दुसऱ्यास्थानी आहेत. भामरे यांनी विद्यमान लोकसभेत १६१ प्रश्न उपस्थित केले. यापैकी बहुतांश प्रश्न आरोग्य तसेच ग्रामीण समस्यांवरचे होते. भामरे हे पेशाने डॉक्टर असून ते महाराष्ट्रातील धुळे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. माझ्या मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. ६०० गावांचा मतदारसंघात अंतर्भाव आहे. त्यामुळेच या गावांतील जनतेशी निगडीत प्रश्न मी संसदेत उपस्थित करत असतो. माझा उद्देश सरकारला जाब विचारण्याचा नसून सरकारी योजनांची वस्तुस्थिती सभागृहापुढे यावी व संबंधित मंत्र्यांचे त्याकडे लक्ष वेधले जावे इतकाच आहे, असे भामरे म्हणाले.

विद्यमान लोकसभेतील ‘टॉप टेन’ खासदारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील चार खासदार प्रथमच निवडून आलेले आहेत. अंदमान आणि निकोबारचे काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे, रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि भाजपचे बालुरघाटचे खासदार सुकांत मजुमदार यांचा त्यात समावेश आहे.

Protected Content