जळगाव प्रतिनिधी । हाताला काम नसल्याने सोन वेचून त्यातून मिळेल तेवढ्या पैशांवर उदरनिर्वाह भागविण्याचे काम काही तरुण करत असतात. अशाच प्रकारे गटारीत सोन वेचणार्या किरण प्रदीप मोरे वय 25 रा. या गेंदालाल मिल या तरुणाचा गुरुवारी सकाळी जोशीपेठेतील गटारीत मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी घराबाहेर पडला होता. गुरुवारी सकाळी गटारीत पाय रहिवाशांना दिसून आल्यानंतर प्रकार समोर आला.
गेंदालाल मिलमध्ये किरण हा वडील प्रदीप पिराजी मोरे, भाऊ राजू, आई निर्मलाबाई याच्यासोबत वास्तव्यास आहे. वडील व भाऊ दोघे हातमजुरी करुन उदरनिर्वाह भागवितात. किरणही गटारी सोन वेचून ते सराफ व्यावसायिकांना देवून मिळणार्या पैशांतून वडीलांसह भावाला उदरनिर्वाहात मदत करायचा. बुधवारी तो नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडला. दुपारी दोन वाजता ठरल्याप्रमाणे गटारीतून सोने शोधून काढल्यानंतर ते विकत घेणार्या सराफ व्यावसायिकाकडून टोपलीसह साहित्य घेतले. यानंतर सोने शोधण्यासाठी जोशीपेठेतील गटारीकडे निघाला असल्याची माहिती कुटुंबियांकडून मिळाली आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जोशीपेठ परिसरात कचरा फेकण्यासाठी आलेल्या रहिवाशाला गटारीत पाय दिसून आला. संशय आल्याने रहिवाशाने इतर नागरिकांना माहिती दिली. गटारीत सोन शोधणारा असल्याने कालपासून बेपत्ता किरणच्या शोधात असलेल्या कुटुंबियांसह त्याच्या परिसरातील मित्रांनी घटनास्थळ गाठले. यानंतर गटारीत पडलेला तरुण हा किरण मोरे असल्याची ओळखी पटली. माहिती मिळाल्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथ महाजन, पोलीस नाईक प्रशांत देशमुख यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवलिा तसेच पंचनामा केला. रुग्णालयात किरणच्या वडिलांसह भावाने आक्रोश केला. शिक्षण नसल्याने तसेच हाताला काम नसल्याने गटारीत काम करुन उदरनिर्वाह भागवित असलेल्या किरणच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी केली