पिंपरी-चिंचवड, वृत्तसंस्था | ‘आम्ही सर्व सावरकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाकडून आयोजित या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांचे ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पोंक्षे यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांचा दिल्लीतील शेंबडा मुलगा असाही उल्लेख केला. “मला तर त्यांचे आभार मानायचे आहेत. मी त्यांच्यावर चिडत नाही. काही मुले गतिमंद असतात. उलट मी त्यांचे आभार मानतो,” असा उपहासात्मक टोला शरद पोंक्षे यांनी लगावला आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, “मी त्यांना विनंती करतो की, सतत दीड-दोन महिन्यांनी त्यांनी अशीच विधाने करत राहावे. त्याच्यामुळे काय होते, हिंदू धर्मियांना एक रोग आहे पटकन थंड होण्याचा. आपण पेटतही लवकर नाही आणि पेटलो तर लवकर थंड होतो. आपल्यातला शिवाजी, सावरकर लवकर जागाच होत नाही. मग अशी माणसे उपयोगी पडतात. ते तिकडे वेड्यासारखा बोलले की, सगळ्यांच्या मनातील सावरकर, शिवाजी, राणा प्रताप, टिळक हे जागे होतात. मग आपण धडाधड त्यांच्याबद्दल शोधाशोध करण्यास सुरुवात करतो. काही मिळतंय का.. असे म्हणत व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होण्यास सुरुवात होते. त्यात माझीही अनेक भाषणे अनेक ठिकाणी फिरतात. मग माझ्यातही सावरकरांबद्दल जागृती होते, ही किती चांगली गोष्ट आहे”.
काय म्हणाले होते राहुल गांधी :-
‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केले होते. राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरे आहे, त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझे नाव राहुल सावरकर नाही, माझे नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल.”