‘यु-टर्न’ म्हणजे ‘उद्धव ठाकरे टर्न’ असे ओळखले जाईल’ – पाटील

chandrakant patil

 

पुणे प्रतिनिधी । सरकारला काम करताना काही मर्यादा असतात हे आम्ही समजू शकतो. पण आता उद्धव ठाकरे यांनाही समजले असेल की केवळ घोषणा करणे आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे यामध्ये किती फरक असतो. पण यापुढील काळात ‘यु-टर्न’ म्हणजे ‘उद्धव ठाकरे टर्न’ म्हणून ओळखला जाईल, असा टोमणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला असून ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जातील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात त्यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने केवळ दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जेच माफ केली आहेत, याकडे चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधले. ‘यू टर्न’ आता ‘उद्धव ठाकरे टर्न’ नावाने ओळखला जाईल, असे सांगायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन काही जण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण लोकांमध्ये जाऊन याविषयी जागरुकता निर्माण करा, असे आवाहनही चंद्रकांत पाटलांनी केले.

गेल्या आठवड्यात संपलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सरकारने शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ करण्याची घोषणा केली. यावरून विरोधी भाजपने राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा भाजपने अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून लावून धरला होता. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली होती. गेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवसेनेनेही त्यावेळी भाजपवर हीच टीका केली होती.

Protected Content