कटक वृत्तसंस्था । येथील तिसर्या एक दिवसीय सामन्यात भारताने चार गडी राखून विजय मिळवत मालिकादेखील २-१ या प्रकारे खिशात घातली.
भारतीय कर्णधार विराटने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यानंतर वेस्टइंडिजने थोडी संथ सुरूवात केली.विंडीजचे सुरूवातीचे चार फलंदाज एविन लुइस २१, शाइ होप ४२, शिमरन हेटमायर ३७ आणि रॉसटन चेजने ३८ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ३१.३ षटकांत ४ बाद १४४ पर्यंत नेली. त्यानंतर निकोलस पूरन आणि कायरन पोलार्ड यांनी शेवटच्या षटकांत तूफान फटकेबाजी करत संघाची धावसंख्या ५० षटकांत ५ बाद ३१५ पर्यंत नेली. निकोलस पूरन याने ६४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारासह ८९ धावांची खेळी केली तर कायरन पोलार्डने ५१ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारासह नाबाद ७४ धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजीत नवदीप सैनीने पदार्पणाच्या सामन्यात १० षटकात ५८ धावा देत २ गडी बाद केले. तर शार्दुल ठाकूरने ६६/१, मोहम्मद शमीने ६६/१ आणि रविंद्र जडेजाने ५४/१ गडी बाद केला.
दरम्यान, ३१६ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामी जोडीने चांगली सुरूवात केली. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांनी शतकी सलामी दिली. रोहित शर्माने शानदार ६३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि एक षटकार लगावला. तर, राहुलनेही ८९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. राहुलने आपल्या खेळीला आठ चौकार आणि एका षटकार ठोकले. जेसन होल्डरने रोहित शर्माला माघारी धाडले. यानंतर लोकेश राहुलही माघारी परतला. राहुलने ७७ तर रोहितने ६३ धावा केल्या. श्रेयस अय्यर, केदार जाधव आणि ऋषभ पंत फार काळ तग धरू शकले नाही. मात्र यानंतर विराटने एक बाजू लावून धरत रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला. ८५ धावांवर किमो पॉलने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर रविंद्र जाडेजाने शार्दुल ठाकूरच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.