जळगाव प्रतिनिधी । गर्भवती मातेने पौष्टीक व संतुलित आहार घ्यावा. त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायामाची जोड द्यावी. यामुळे प्रसूती नॉर्मल होण्याची शक्यता वाढते. सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय मातेच्या प्रकृतीच्या परिस्थितीनुसार घ्यावा लागतो असा सूर गुरुवारी आयोजित परिसंवादात मान्यवर स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी व्यक्त केला.
येथील जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे युवा अमोग्स या राज्यस्तरीय परिषदेनिमित्त नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन या विषयावर जनजागृतीपर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ.सुजाता महाजन, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कल्पना पाटील, डॉ. विलास भोळे, आयोजन सचिव डॉ.अंजली भिरुड, डॉ.सारिका पाटील, डॉ.सुमन लोढा उपस्थित होते. प्रसंगी दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी उदघाटन केले. यावेळी प्रसूतीविषयी जनजागृतीपर चारोळ्या डॉ. सारिका पाटील, डॉ.अंजली भिरुड, डॉ.वैशाली चौधरी यांनी सादर केल्या.
परिसंवादात मान्यवर वक्त्यांनी प्रोजेक्टरद्वारे माहिती देत प्रसूती कशी होते, त्यातील वेळोवेळी येणाऱ्या अडचणी, गर्भवती मातेने घ्यावयाची काळजी, आहार, व्यायाम याविषयी माहिती दिली. डॉ.सुमन लोढा म्हणाले की, डॉक्टरांचा नॉर्मल प्रसूती करण्याकडे कल असतो.मात्र गर्भवती स्त्रीच्या प्रकृतीनुसार परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर सिझेरियन करावे लागते.
डॉ. विलास भोळे यांनी, माता मृत्यूची भीषणता सांगत माता मृत्यु दर कमी करण्यासाठी शासन आणि महिला संघटनांनी चांगले प्रयत्न केले आहे. डॉक्टर-रुग्ण नाते विश्वासाचे राहिले पाहिजे असे सांगत सिझेरियन प्रसूतीचा इतिहास सांगितला. डॉ. वर्षा लहाडे यांनी माता आणि बाळाचे आरोग्य महत्वपुर्ण आहे. वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. वजन जास्त असले किंवा बाळ पायाळू असले तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता कमी असते हे सांगून महाराष्ट्रातील सिझेरियन प्रसूतीची आकडेवारी सांगितली.
सूत्रसंचालन वर्षा लहाडे तर आभार डॉ. सुमन लोढा यांनी केले. यावेळी आयएमए संघटनेचे सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील, डॉ.तुषार बेंडाळे, डॉ.रुपाली बेंडाळे, डॉ.प्रियंवदा महाजन, डॉ.वैशाली जैन, डॉ. दीप्ती पायघन, डॉ.शाहिद खान , डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.