विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात
जळगाव प्रतिनिधी । ज्ञान आणि माहिती यातील फरक लक्षात घेत, ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करा असे आवाहन अमेरिकेतील सुप्रसिध्द भारतीय उद्योजक डॉ.मुकुंद करंजीकर यांनी दीक्षांत समारंभात स्नातकांना उद्देशून केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २७व्या पदवीप्रदान समारंभ ९ रोजी मोठया उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मुकुंद करंजीकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. डॉ.करंजीकर यांनी यावेळी उद्योजकता आणि भारतीय तरुण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, उद्योजक होण्यासाठीच्या आपल्याकडे रुढ असलेल्या भ्रामक कल्पना दूर करुन तरुणांनी आपल्या नवीन सर्जनशिल कल्पना विकसित कराव्यात व यशस्वी उद्योजक होण्याचा प्रयत्न करावा भारतात उद्योजक होण्यासाठी तरुणांना मोठी संधी आहे. कारण देशाची पन्नास टक्के लोकसंख्या पंचवीस वर्ष वयोगटाच्या आत आहे. उद्योजक होणे म्हणजे केवळ नवीन व्यवसाय सुरु करणे असे नव्हे, तर नवनवीन कल्पना आणि त्या कल्पनांचा सामाजिक उपयोग आवश्यक आहे. परंपरागत विचार न करता नाविन्यपूर्ण विचार करण्याची गरज आहे. नोकरी न करता नोकरी देणारे व्हा, असे आवाहन करताना डॉ.करंजीकर यांनी देशातील जुन्या आणि नवीन प्रतिमानांचा उल्लेख केला.
श्रीमंती विरुध्द गरीब आणि काहींना प्राप्त झालेले विशेषाधिकार विरुध्द विशेेषाधिकार नसलेल्या व्यक्ती ही जुनी प्रतिमाने झाली असून आताच्या युगात ज्ञान विरुध्द अज्ञान,ज्ञानाचे झालेले लोकशाहीकरण, ज्ञान व उद्योजकता यामुळे समाजाची होत असलेली भरभराट ही नवीन प्रतीमाने उदयाला आली आहेत. उद्योजक होण्यासाठीच्या रुढ असलेल्या भ्रामक कल्पनांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, उद्योजक हा मुलत: जन्माला येत असतो, रात्रभरातून यश प्राप्त होते किंवा भाषा हा उद्योजक होण्यासाठी अडथळा आहे, संसाधने नसलेल्या वातावरणात उद्योजक होणे शक्य नाही अशा काही भ्रामक कल्पना दूर सारण्याची गरज आहे. भारतातील सांस्कृतिक परंपरेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, अध्यात्म ही जुनी संस्कृती आहे. अहम्ं ब्रम्हास्मी, कर्मसिध्दांत आणि मानवी गुणधर्म यावर विश्वास ठेवा. उद्योजक होण्यापूर्वी आपला कल ओळखा, व्यवसायाचे मॉडेल निश्चित करा. त्यासाठी सल्लागार शोधा, मेहनतीची तयारी ठेवा आणि अपयश आले तरी सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
तरुणांना सिंथेटिक बायोलॉजी, शाश्वत ऊर्जा, शाश्वत कृषी, हवामानातील बदल, रोबोट, वायरलेस संप्रेषण,डेटा विश्लेषण या क्षेत्रात संधी उपलब्ध आहे असे डॉ.करंजीकर म्हणाले. त्यांनी यावेळी व्यवसाय यशस्वी करण्याच्या काही टिप्स् देताना महाविद्यालयीन मित्र, कुटुंब शिक्षक, सार्वजनिक ठिकाणी भेटणारे लोक यांच्याशी चांगले संबंध ठेवत आपले नेटवर्क विस्तारावे, निर्णय घेताना गोंधळू नका, उत्पादनाची धुर्तपणे विक्री करु नका, कोणतीही गोष्टी अशक्य नाही, अपयशातून बज्याच काही गोष्टी शिकायला मिळतात.ग्राहक, गुंतवणूकदार कर्मचारी आणि सल्लागार यांच्याशी सतत संवाद साधा असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेतला. नामविस्तारानंतर हा पहिलाच दीक्षांत समारंभ असल्यामुळे या समारंभाला एक वेगळे महत्व आहे असे सांगून खानदेशातील तरुणांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात ज्ञानाची अखंड ज्योत पेटवत त्यांच्या पायावर समर्थपणे उभे करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न अव्याहतपणे सुरु असल्याचे नमूद केले.
यावेळी गुणवत्ता यादीतील ९० विद्याथ्र्यांना अतिथींच्या हस्ते सुवर्णपदके देण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्याथ्र्यांच्या यादीचे वाचन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशुतोष पाटील, डॉ.विजयप्रकाश शर्मा व प्रा.सुरेखा पालवे यांनी केले.
यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.एस.टी.इंगळे, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी, प्रा.नितीन बारी, प्रा.मोहन पावरा, डॉ.सुभाष चौधरी, श्री.दीपक पाटील, श्री.विवेक लोहार, डॉ.जितेंद्र नाईक, डॉ.प्रिती अग्रवाल, डॉ.प्रशांत कोडगिरे, प् प्रा.प्र्रशांत मगर (सहसंचालक, उच्च शिक्षण),डी.पी.नाथे (प्रभारी सहसंचालक,तंत्रशिक्षण), कुलसचिव भ.भा.पाटील, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एस.आर.गोहिल,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, उपस्थित होते.
या पदवीप्रदान समारंभात ३८ हजार ९१२ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १५ हजार ६३१ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४हजार ४६६ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे १७ हजार ७८८ आणि आंतर विद्याशाखेचे १०५७ स्नातकांचा समावेश आहे. तसेच २५१ पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.