
नवी दिल्ली वृत्तसंस्था । मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधातील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्या याचिकेवर जानेवारी महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले असून मेट्रो कारशेडसाठी ते आणखी एक पर्यायी जागा शोधत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडे तोडण्यात आली. त्याविरोधात वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. स्थानिकांसह मुंबई आणि परिसरातील नागरिक आणि वृक्षप्रेमींनी आंदोलनही केलं होतं. आरेतील वृक्षतोडीचं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठाने ७ ऑक्टोबरला आरेतील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती दिली होती. तसेच आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात यावी, असे आदेशही कोर्टाने पोलिसांना दिले होते. आतापर्यंत किती झाडे तोडली त्याचा तपशीलही देण्यात यावा, असे निर्देशही कोर्टाने दिले होते. आरेतील वृक्षतोडीवर २१ ऑक्टोबरलाही सुनावणी झाली होती. त्यावेळी कोर्टाने वृक्षतोडीवरील मनाई आदेश कायम ठेवताना ‘जैसे थे’ स्थिती १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली होती. त्यानंतर सर्व याचिकांवरील पुढील सुनावणी होईपर्यंत आधीचा आदेश कायम ठेवला होता.


