औरंगाबाद वृत्तसंस्था । संघर्षातून राज्यात भाजप-शिवसेना युती तुटली असून शिवसेनेने भाजप सोडून कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. मात्र, याचे पडसाद आता औरंगाबाद महानगरपालिकेत पडू लागले आहेत. सेना-भाजपचे नगरसेवक गोंधळ आता नव्या वळणावर पोहोचला आहे. शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ दिसला असून भाजपच्या उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून भाजपचे 22 नगरसेवकांनी एकत्र राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले की, सर्व 22 नगरसेवक लवकरच राजीनामा देणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून याची कुणकुण सगळ्यांना लागली होती. अखेर शुक्रवारी सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडला. जवळपास 27 वर्षे एकत्र नांदलेल्या भाजप-सेनेच्या नगरसेवकांनी आता काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरीही औरंगाबाद पालिकेचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत विजय औताडे यांनी नेहमीप्रमाणे महापौरांच्या खुर्चीजवळ न जाता नगरसेवकांमध्ये जाणे पसंत केले. त्यानंतर औताडे यांनी राजीनाम्याची घोषणा करत खळबळ उडवून दिली. औरंगाबाद महापालिका निवडणुकीला अवघे चार महिने बाकी असताना भाजपने हा पवित्रा घेतला आहे.