मुंबई वृत्तसंस्था । मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला अखेर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकामागोमाग एक असा निर्णयांचा सपाटाच लावत आहे.
मध्यवैतरणा जलाशय पूर्ण केल्यावर त्यातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र विजनिर्मिती केंद्र सुरु करु असे वचन शिवसेनेने दिलं होत. मुंबई महानगरपालिकेच्या 2002 च्या वचननाम्यात शिवसेनेनं याबाबत नमूद केले होते. नुकतंच उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबतची वचनपूर्ती करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयात मुंबई महापालिकेला आपले स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून ही वीज निर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेला केराची टोपली दाखवत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव महामार्गाला देण्यात आले.