जळगाव प्रतिनिधी । वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर, लवकरच भाजपच्या जिल्हाध्यक्षांची निवड होणार असून यात ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांना दावा मजबूत मानला जात आहे.
सध्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करून आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते पक्षांतर करतात की, पक्षात राहूनच विरोधकाची भूमिका बजावतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमिवर, भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकारीणीची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये जिल्हाध्यक्षांसह विविध कार्यकारण्यांची नियुक्ती याद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. नुकतेच दिवंगत झालेले उदय वाघ यांनी लागोपाठ दोन टर्म जिल्हाध्यक्षांची जबाबदारी पार पाडली असून सध्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील हेदेखील जळगाव लोकसभा मतदारसंघातील आहेत. या पार्श्वभूमिवर, आगामी जिल्हाध्यक्षपद हे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने जिल्हाध्यक्षपदासाठी माजी खासदार हरीभाऊ जावळे, माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर आणि ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस तथा भुसावळचे माजी नगरसेवक अजय भोळे यांची नावे चर्चेत आहेत.
हरीभाऊ जावळे यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असून त्यांचे लवकरच वरिष्ठ पातळीवर पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. यामुळे स्पर्धेत अशोक कांडेलकर आणि अजय भोळे उरतील. यातील कांडेलकरांच्या नावावर खडसे समर्थक असल्याने फुली पडण्याची शक्यता असून याचमुळे अजय भोळे यांचा दावा पक्का झाल्याचे समजते. जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे यांच्या वर्चस्वाविरूध्द गिरीश महाजन यांचा गट उभा ठाकल्यानंतर काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे. यात खडसे यांच्या वर्चस्वाला खुले आव्हान देण्याचे धाडस अजय भोळे यांनी दाखविले होते. यामुळे याआधीच त्यांना बढती मिळण्याची शक्यता होती. दुर्दैवाने तसे न झाल्यामुळे आता जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांना संधी दिली जाईल असे वृत्त आहे. ते स्वत: लेवा पाटीदार समाजातील असल्याने या माध्यमातून सामाजिक समीकरण साधले जाईल असे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.
अजय भोळे हे पहिल्यापासून संघ स्वयंसेवक असून गत २५ वर्षांपासून पक्षात कार्यरत आहेत. भुसावळ नगरपालिकेत संतोष चौधरी यांना वॉर्डात हरवून जायंट किलर ठरलेल्या भोळे यांनी लागोपाठ तीन वेळेस नगरसेवकपदावर कार्य केले आहे. स्थानीक राजकीय कुरघोड्यांमुळे ते सध्या लोकप्रतिनिधी नसले तरी पक्षाने दिलेल्या जबाबदार्या वेळोवेळी त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. या पार्श्वभूमिवर, त्यांचासारखा तरूण व आक्रमक जिल्हाध्यक्ष मिळाल्यास पक्षाला लाभ होऊ शकतो. यासोबत सामाजिक समीकरणासह अर्थातच गिरीश महाजन यांचे पाठबळ या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. यामुळे ते जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत बाजी मारण्याची दाट शक्यता आहे.