औरंगाबाद (वृत्तसंस्था) महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच अस्तीक कुमार पांडे यांनी आपल्याच नगर रचना विभाग प्रमुखांना प्लास्टिकचा वापर केला म्हणून पाच हजाराचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे पांडे यांच्या स्वागतासाठीच आणलेल्या पुष्पगुच्छांमध्ये प्लास्टिकचा वापर केलेला होता.
नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन यांनी आयुक्त अस्तीक कुमार पांडे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या दलनात पुष्पगुच्छ घेऊन गेले होते. परंतु, ते पुष्पगुच्छ बनविण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला होता. पांडे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी जागेवरच महाजन यांच्याकडून 5,000 रुपये स्पॉट फाईन वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ लिपिक अनिल बोंडे यांनी महाजन यांच्याकडून 5000 रुपये दंड वसूल करून त्याची पावती दिली.