नवी दिल्ली वृत्तसंस्था । नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या नेहरू चषक हॉकी स्पर्धेत पंजाब पोलिस आणि पंजाब नॅशनल बँक यांच्यात सामना सुरु असतांना अचानक दोन्ही संघातील खेळाडूंनी हॉकीने एकमेकांवर हल्ला करायला सुरु केली. या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा आयोजकांनी धक्का बसला. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांवर हॉकीने हल्ला करताना त्यात दिसत आहेत. या व्हिडिओत पंजाब पोलीस संघाचे खेळाडू लाल जर्सीमध्ये असून बँकेचे खेळाडू पांढऱ्या जर्सीमध्ये दिसत आहेत. बँकेच्या खेळाडूपेक्षा पंजाब पोलीस संघाचे खेळाडू अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पंजाब पोलीस संघाचे खेळाडू हातात हॉकी घेऊन संपूर्ण मैदानात पीएनबीच्या खेळाडूंच्यामागे धावताना दिसत आहेत. तर पीएनबीचे खेळाडू जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळताना दिसत आहेत. पळताना पीएनबीचा एक खेळाडू पडल्याने त्याला पंजाब पोलीस संघाच्या खेळाडूने गाठले आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्याचेही या व्हिडिओत दिसून येत आहे. दरम्यान, दोन्ही संघ आपआपसात भिडल्याचे लक्षात आल्यानंतर आयोजकांनी मैदानात धाव घेऊन दोन्ही संघाला शांत केले. त्यानंतर दोन्ही संघादरम्यान पुन्हा सामना सुरू झाला. दोन्ही संघाच्या प्रत्येकी ८-८ खेळाडूंनी सामना सुरू केला. यावेळी पीएनबीने हा सामना ६-३ च्या फरकाने जिंकला.