जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी शहरात डेंगू सदृश्य रुग्णांची वाढ होत असल्याने नाराजी व्यक्त करत शहरात फाॅगिंग व अबेटिंग व्यवस्थित होत नसल्याचा आरोप करत आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभेला सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. सभा सुरु असतांना शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने मनपातर्फे काय उपाययोजना करण्यात आली आहे असा प्रश्न भाजपचे नगरसेवक सुनील खडके यांनी उपस्थित केला असता आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी फाॅ गिंग सुरु असून त्याचा १५ दिवसांचा कार्यक्रम आखण्यात आला असल्याचे सभागृहात सांगितले. यावर शिवसनेचे नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी कोणत्याही प्रभागात फाॅगिंग सुरु नसून नगरसेवकांनी मागणी केली तरच फाॅगिंग केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. फाॅगिंग मशीनच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर सभापती अॅड. हाडा यांनी फाॅगिंग मशीन वाढविण्याचा प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना केल्यात. भूमिगत गटर योजना सुरु करण्यापूर्वी अमृत योजनेसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्यात आल्यानंतर गटर योजनेस प्रारंभ करावा अशी मागणी भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली. पाईप लाईन दुरुस्तीचा १० लाख खर्चाचा प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन पाईप लाईन वारंवार का फुटते याबाबतचे कारण शोधून त्यावर उपाय योजना करण्याच्या सूचना सभापती अॅड. हाडा यांनी दिल्या. स्थायी समोर एखादा विषय सदस्यांनी मांडल्यानंतर त्याची नोंद घेऊन त्यावर काय उपाययोजना करण्यात आली याची माहिती पुढील स्थायी सभेत देणे विभाग प्रमुखांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच समस्या सोडवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्या देखील पुढील स्थायी सभेत मांडण्याच्या सूचना सभापती यांनी केल्या. दरम्यान, नगरसेविका रेश्मा काळे यांनी शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर सभापती अॅड. हाडा यांनी लवकरच पैसे द्या आणि वापर करा या तत्वावर शौचालय व मुतारी चालविण्यात येणार असल्याची माहिती दिली.