रावेर प्रतिनिधी । देशातील सर्व शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा, अशी पंतप्रधान मोदी यांची इच्छा आहे. परंतू बॅंकेत कर्मचाऱ्यांच्या अभावी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी खातेधारकांचे कामे दिवसभर थांबून सुद्धा होत नाहीत. यासाठी तात्काळ पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत केली.
सर्वसाधारण शेतकऱ्यांचे बँक खाते राष्ट्रीय बँकेत असते. परंतू या बँकाची संख्या कमी असून बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणा-या शेतकरी खातेधारकांचे कामे दिवसभर थांबून राहते. काही वेळा ते होत सुद्धा नाही. शेतकऱ्यांना त्यांना त्यांचे शेतीची कामे उरकण्यासाठी सध्या वेळ खूप महत्त्वाचा आहे. त्यातच महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा अंधारात गेली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील कामकाज अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बंद ठेवून टाळे लावलेले होते. राष्ट्रीय बँकामध्ये पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांची बँकेतील कामे वेळेत होतील. यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी आज लोकसभेत केली आहे.