चाळीसगाव प्रतिनिधी । स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांसाठी कोणताही ठोस तोडगा निघालेले नाही. असे विधान नाम फाऊंडेशनचे संस्थापक तथा नामांकित सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले आहे. ते धुळे जिल्ह्यातील मांडळ येथील नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.
धुळे जिल्ह्यातील मांडळ येथील नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमानंतर अनासपुरे औरंगाबादकडे निघाले. दरम्यान, चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चव्हाण यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. यावेळी जलसंधारणाच्या नाम फाउंडेशने केलेल्या कामाबद्दल समाधानकारक चर्चा अनासपुरे यांनी केली. तसेच त्यांनी सांगितले की, आता अधिक प्रमाणात वृक्ष लागवडीची गरज असून देशी झाडांची लागवड जास्त प्रमाणात व्हावी, असे ते म्हणाले. या देशात नोकरदारांना सात वेळा वेतन वाढ करण्यात आली. मात्र शेतमालाच्या भावाबाबत अद्यापही ठोस उपाय योजना शासन स्तरावर झाली नसल्याने शेतकरी नेहमी नुकसानग्रस्त राहिला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार, उपाययोजना होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी सुभाष चव्हाण यांनी चाळीसगाव भागात नाम फाऊंडेशनच्या कार्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी करगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुधाकर राठोड, सुभाष जैन, बाळासाहेब पाटील, कांतीलाल राठोड, साहेबराव काळे, राहुल पाटील आणि योगेश शर्मा आदी उपस्थित होते.
पहा : मकरंद अनासपुरे काय म्हणाले ते