फैजपूर प्रतिनिधी । रावेर-यावल तालुक्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातून खरीपचा पूर्ण हंगाम गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी, अशी मागणी रावेरचे नवनिर्वाचित आ.शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज येथील प्रांताधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली असून उद्या (दि.८) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नुकसानीमुळे शेतक-यांच्या हातून खरीपाचा पूर्ण हंगाम गेला आहे. उडीद, मूग व इतर कडधान्ये ज्वारी, मका, कापूस व हळद ही पीके उध्वस्त झाली असून नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई व वीज बिल माफी मिळणे आवश्यक आहे. शासनातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पण परिस्थिती अशी आहे की, पंचनामे न करता शेतक-यांना सरसकट मदत दिली पाहिजे. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात यावे, यासाठी शुक्रवार दि. ०८ नोव्हेंबर रोजी रावेर-यावलचे नवनिर्वाचित आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर येथे प्रांत कार्यालय फैजपूर यांना निवेदन देण्यासाठी शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चाचे नियोजन
उद्या सकाळी १०.०० वाजता सुभाष चौकात सर्व शेतकरी बांधवांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, रावेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नीळकंठ चौधरी यांनी केले आहे. यावेळी माजी आमदार रमेश चौधरी, अरुण पाटील, माजी जि.प.सदस्य रमेश पाटील तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत.