मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेकडे १७५ आमदारांचे संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल, असे खळबळजनक विधान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत केले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका पत्रकारांसमोर मांडली. राज्यात सर्वात मोठा पत्र असलेल्या भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठीच्या अंतिम निर्णयापर्यंत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असून त्याचा शपथविधी शिवतीर्थावर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.
राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेला पाठिंबा देणारी संख्या वाढली आहे. कालपर्यंत १७० होती, ती आज १७५ पर्यंत आली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेना मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतिर्थावर शपथ घेईल. उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले असून, लवकरच गणित माध्यमांसमोर मांडण्यात येईल,” असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, भाजपने सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला असून भाजपचे राजकारण हे गुंडांच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा करण्यात आला, यासंबंधीची माहिती आपल्याकडे आली असून याचा लवकरच आपण पर्दाफाश करणार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.