इसीसचा म्होरक्या अल बगदादी ठार

bagdadi

वॉशिंग्टन वृत्तसंस्था । इस्लामीक स्टेट अर्थात इसीस या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याला अमेरिकेने आज ठार केले असून राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

इस्लामीक स्टेट अर्थात इसीस संघटनेने गत काही वर्षांमध्ये क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या होत्या. या संघटनेने हजारो लोकांचे अतिशय भयंकर प्रकारे शिरकाण केले. संपूर्ण जगाला कट्टर इस्लामीक राज्यात परिवर्तीत करण्यासाठी इसीस जन्माला आले होते. अबू बकर अल बगदादीच्या नेतृत्वाखाली या संघटनेने सोशल मीडियाचा अतिशय कौशल्याने वापर करून जगभरातील विविध देशांमध्ये आपले नेटवर्क स्थापित केले होते. इराक आणि सिरीयात इसीसने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अमेरिकेने दोस्त राष्ट्रांसह इसीसचा नायनाट केला तरी बगदादी फरार होण्यात यशस्वी झाला होता. तो एका खंदकात लपून बसला होता. तेथेच त्याचा आज खात्मा करण्यात आला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांनी आज सकाळी आज काही तरी घडणार असल्याचे ट्विट केल्यामुळे जगाला याबाबत उत्सुकता लागली होती. यानंतर काही तासांनी त्यांनी पुन्हा ट्विट करून बगदादी ठार झाल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, बगदादी हा भेकडासारखा मेला. तो दयेची भीक मागत होता. त्याची तीन मुलेदेखील त्याच्या सोबत होती. अमेरिकन सैन्याने त्यांना घेरले होते. मात्र त्याने स्वत:ला उडवून दिले असून यात त्याचा खात्मा झाल्याची माहिती ट्रंप यांनी दिली आहे. वायव्य सिरीयात त्याला ठार मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आधी अनेकदा बगदादी ठार झाल्याचे दावे करण्यात आले होते. तथापि, आज पहिल्यांदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी घोषणा केल्याची बाब लक्षणीय आहे.

Protected Content