भुसावळ, प्रतिनिधी | हिंदू बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली दीपावली अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यानिमित्त शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. तरीही नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका तसेच गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेली पावसाची रिपरिप सुरू असल्याने ग्राहकाने बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याचे दृश्य आहे . बाजारपेठेत मंदीचे सावट निर्माण झाले असल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे.
दीपावली सणानिमित्त बाजारपेठेमध्ये अनेक आकर्षक आकाश कंदील, विविध आकारातील पणत्या , रांगोळी पावडर, रांगोळी डिझाईन्सची पुस्तके, अन्य साहित्य व रंग, विविध प्रकारची तोरणे, बाजारपेठेत दाखल झालेले आहेत. तसेच ८० रुपयांपासून ६५० रुपयापर्यंत आकाश कंदीलांच्या किंमती आहेत. तरीही सध्या मात्र विधानसभा निवडणुकांची धामधूम व गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस यामुळे बाजारपेठेवर विपरित परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे.