भुसावळ प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात फिरत असतांना सर्वसामान्य जनतेने दिलेल्या प्रेमामुळे आपण भारावलो असल्याची प्रतिक्रिया महाआघाडीचे उमेदवार जगनभाई सोनवणे यांनी व्यक्त केली. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. दरम्यान, याच जनतेच्या पाठींब्यावर भुसावळात परिवर्तन होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी महाआघाडीचे भुसावळातील उमेदवार जगनभाई सोनवणे यांनी आपल्या दणकेबाज वक्तृत्वशैलीसह प्रचारास प्रारंभ केला आहे. या निवडणुकीबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मी तालुक्यातील कान्याकोपर्यातील जनतेची भेट घेत आहे. प्रचारासाठी फिरत असतांना मतदार माझे अतिशय उत्स्फुर्तपणे स्वागत करत असून यामुळे आपण अतिशय भारावलो आहोत. भुसावळ व वरणगाव शहरासह ग्रामीण भागातील मतदारांनी दिलेला हा प्रतिसाद पाहता यंदा परिवर्तन होणार असल्याचा आशावाददेखील जगनभाई सोनवणे यांनी व्यक्त केला.
जगनभाई सोनवणे पुढे म्हणाले की, वैयक्तीक भेटीगाठी आणि सामूहिक प्रचार या दोन्ही पातळ्यांवरून आपण लोकांशी संपर्क साधत आहोत. तर उद्या भुसावळात मोठी सभा घेणार आहे. नुकत्याच जाम मोहल्ल्यात झालेल्या सभेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. भुसावळ मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन मांडून आपण कौल मागत असून याला प्रतिसाद मिळणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला.