नवी दिल्ली, वृत्तसंस्था | आपलेच ‘एमआय १७’ हेलिकॉप्टर चुकून पाडल्याप्रकरणी भारतीय हवाई दलाने आपल्या सहा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातील दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागणार आहे.
१६ फेब्रुवारीला बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतीय सैन्य दलाच्या कॅम्पवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो अपयशी ठरला होता. त्याच दिवशी भारतीय हवाई दलाच्या काही अधिकाऱ्यांनी आपलेच एक हेलिकॉप्टर पाडले होते. त्यात सहा अधिकारी शहीद झाले होते. भारतीय हवाई दलाचेच हेलिकॉप्टर पाडल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना आता कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागणार आहे. तर उर्वरित चार अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारवाईला सामोरे लागणार आहे. एक ग्रुप कॅप्टन आणि एक विंग कमांडरला कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागणार आहे, असे संरक्षण दलातील सूत्रांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी हवाई दलाने फेब्रुवारीमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न हवाई दलाने हाणून पाडला होता. त्याचवेळी श्रीनगरजवळ बडगाममध्ये भारतीय हवाई दलाचे एमआय १७ हे हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात असलेले सर्व सहा अधिकारी शहीद झाले होते. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, श्रीनगरमध्ये तैनात आपल्याच दलातील अधिकाऱ्यांनी ते हेलिकॉप्टर पाडले होते, अशी माहिती समोर आली होती. २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर होती. हेलिकॉप्टर पाडण्याच्या १० मिनिटे आधीच त्याने उड्डाण केले होते.
पाकिस्तानच्या हवाई दलाशी सामना करताना आपल्याच दलाचे एमआय १७ हे हेलिकॉप्टर चुकून पाडणे ही मोठी आणि गंभीर चूक होती, अशी कबुली अलीकडेच हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी दिली होती. अशी चूक भविष्यात कधीच होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी देशाला दिली होती. आमच्याच मिसाइलने हेलिकॉप्टर पाडले होते. ते स्पष्ट झाले आहे. प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले होते.