जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमधील राष्ट्रवादीतील मतभेद जवळपास संपुष्टात आणण्यात माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांना यश आले आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई महाजन यांची राजकीय ताकद वाढली आहे.
राष्ट्रवादीमधील स्थानिक नेत्यांमध्ये मागील दिवसांपासून मतभेद होते. परंतू धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी सर्वांना एकत्र करत गैरसमज दूर केले आहेत. त्यामुळे जळगाव ग्रामीणमधील राष्ट्रवादी एकवटली आहे. तशातच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि युवानेते विशाल देवकर यांनी देखील प्रचारात सक्रीय सहभाग घेल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. धरणगाव शहरात देखील माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी प्रचाराची धुरा सांभाळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवार पुष्पाताई महाजन यांना मतदार संघात आता मोकळे फिरता येत आहे. एकंदरीत ज्ञानेश्वर महाजन यांनी आपल्या राजकीय कौशल्याने सर्व नेते आणि कार्यकर्ते यांना एकत्र करण्यात यश मिळविले आहे. या सर्व गोष्टींचा फायदा उमेदवार पुष्पाताई महाजन यांची राजकीय ताकद वाढविण्यासाठी होत आहे.