जळगाव (प्रतिनिधी) तुम्ही युतीच्या भानगडीत पडू नका, युतीचे काय करायचे ते वरचे बघतील. तुम्ही फक्त लंगोट बांधून तयार राहा, जो आपल्या रस्त्यात येईल त्याला आडवा करा, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यांच्या नियोजनासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जळगाव जिल्ह्यात दौरा असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाल. यावेळी दौऱ्याचे नियोजनबद्दल मार्गदर्शन करताना, ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेत बाळासाहेबांनी सांगावे आणि आपण सर्वांनी करावे, अशी पद्धत राहिली आहे. उत्तर महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून आपण शिंगाडा मोर्चा काढलेला नाही. पंढरपूरची सभा ही विभागाची होती. त्यापेक्षाही जळगावची सभा मोठी झाली पाहिजे. खासदार ए.टी.नाना पाटील यांच्यासाठी काम करण्याची मानसिकता नव्हती. मात्र, आदेश आल्यानंतर करावे लागले होते. शिवसेनेमुळे ए.टी. नाना पावणे पाच लाख मतांनी निवडून आले. मतदानाच्या वेळी हिंदुत्ववार पाहून बटन दाबले जाते. पाचोऱ्याची सभा गाजल्यास राज्यात आपलीच सत्ता येईल, असे देखील ना.पाटील म्हणाले. जुन्यांचा सन्मान आहे, फक्त जुन्यांनी चुना लावू नये, संघटनेला फसवू नये. तसेच संघटनेकडे सगळेच मागतात. मात्र, संघटनेला काय दिले? याचा सुद्धा विचार व्हावा, असे देखील ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, उध्दव ठाकरेंचा दौरा म्हणजे युतीपेक्षा शिवसेनेची ताकद दाखविण्याची संधी असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन म्हणाले. यावेळी शिवसेना संपविण्याची भाषा करणार्या भाजपाच्या मंत्र्यांना मातीत गाडायची तयारी ठेवा, असे आवाहन शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले. राज्यात आपल्यापेक्षा भारतीय जनता पार्टीलाच युतीची गरज अधिक असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या मंत्र्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे,असे देखील सावंत म्हणाले. तर राज्यात युतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. युती होइल की नाही? हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाच माहिती आहे. पण युती झाली, तरी जळगावची जागा शिवसेनेकडे घ्यावी अशी मागणी आ. किशोर पाटील यांनी यावेळी केली.